दत्ता वाळवेकर हे फक्त उत्तम भावगीत गायक - संगीतकारच नव्हते, तर उत्तम शिक्षक, संगीत गुरु, समीक्षक, साहित्यिक, छायाचित्रकार, चित्रकार आणि होमिओपॅथीचे अभ्यासकहि होते. त्यांनी शास्त्रीय संगीताचे फार शिक्षण घेतले नसूनही त्यांच्या संगीतरचनांची बैठक शास्त्रीय संगीतावर आधारलेली वाटायची.
‘मास्टर दत्ता’ या नावाने लोकप्रियता मिळवल्यावर दत्ता वाळवेकरांनी आपले शेकडो भावगीतगायन कार्यक्रम सादर केले. आरंभी फक्त आपले गुरु गजानन वाटवे यांची गीते गाणाऱ्या वाळवेकरांनी नंतर अनेक गीते स्वतः स्वरबध्द केली. कवीवर्य ग. दि. माडगूळकर, सुधांशू, यशवंत, अनिल, माधव पातकर, भालचंद्र खांडेकर, अशा कवींच्या नव्या कविता ते स्वरबध्द करुन सादर करीत.